-संजय खाकरेपरळी (बीड): कोल्हापूर-नागपूर रेल्वे गाडीच्या एस १ व एस २ डब्यात सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन प्रवासी महिलांच्या गळ्यातील साडेतीन लाख रुपयांच्या किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व साखळी चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी परळी रेल्वे पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
याबाबतची माहिती अशी की, १४ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूरहून -नागपूरकडे निघालेली रेल्वे परळी मार्गे घाटनांदुरकडे रवाना झाली. घाटनांदुर रेल्वे स्टेशनजवळ क्रॉसिंग होत असताना खिडकीतून हात घालून चोरट्यांनी महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. माहिती मिळताच गस्तीवरील रेल्वेपोलीस ठाणे परळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे टमकीकर यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु, अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले.
दरम्यान याप्रकरणी बालाजी शंकर बडगे ( रा. अंबुलगा, तालुका निलंगा जि.लातूर) व वर्षा त्रिपाठी ( रा. राधानगरी, कोल्हापूर) या दोघांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी पहाटे चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळास आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक किशोर मलकुनाईक यांनी भेट दिली.