बीड : जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने आधार नूतनीकरण व नवीन आधार कार्ड काढण्यासाठी जवळपास १७३ सेंटर कार्यरत आहेत. त्यापैकी काही ठिकाणी आधर नूतनीकरण केले जात नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. बीडसह इतर पोस्ट ऑफीसमधील आधार अपडेट मशीन धूळखात पडलेल्या अवस्थेत आहेत.
कोणत्याही शासकीय कामासाठी आधार कार्ड महत्त्वाचे आहे. मात्र, अनेकवेळा आधारवरील नाव, जन्मतारीख अथवा, गाव चुकीचे असेल तर, ते अपडेट करणे गरजेचे असते. यासाठी बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने १३२ ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही बँकांमध्ये व पोस्ट कार्यालयातसुध्दा ही सुविधा उपलब्ध आहे. बहुतांश ठिकाणी सुविधा चांगली असल्यामुळे नागरिकांची सोय होत आहे. तसेच आधार सेंटर मागील काही काळात वाढवल्यामुळे या यंत्रणेवरील ताणदेखील कमी झाला आहे. तरीही प्रत्येक सेंटरवर दररोज सरासरी १० पेक्षा अधिक नवीन नोंदणी व बदल केले जातत. काही ठिकाणी मात्र, या आधार अपडेट मशीन बंद असून, त्याठिकाणी नागरिकांची गौरसोय होत आहे. बीड व इतर ठिकाणच्या पोस्टात तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. त्याठिकाणी कर्मचाऱ्यास विचारणा केली असता, आधार अपडेट करण्यासाठी प्रत्येकाची दिवसाआड ड्युटी लावलेली आहे, असे सांगण्यात आले. मात्र, पोस्टातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे मशीन धूळखात पडलेले असल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाने आधार सेंटरकडे लक्ष द्यावे व नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कोणाचे किती आधार सेंटर
पोस्ट ऑफीस १६
जिल्हा प्रशासन १३२
बँक २५
का करावे लागते आधार नूतनीकरण
आधार कार्डवरील नावातील बदल किंवा राहण्याचे ठिकाण तसेच लग्न झाल्यानंतर नावातील बदल यासाठी आधार नूतनीकरण मोठ्या प्रमाणात केले जाते.
आधार नूतनीकरण करण्यासाठी अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा नागरिकांसोबत सुसंवाद नसल्याचे दिसून येते. रांग नसतानादेखील आधारवरील बदल करण्यासाठी वेळ लावला जातो.
जयश्री जगताप
आधार कार्डवरील बदल करण्यासाठी पोस्टातील १६ सेंटर मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करून बंद ठेवण्यात आलेली आहेत. ती तत्काळ सुरू करावीत.
राहुल वायकर, संभाजी ब्रिगेड माजी जिल्हाध्यक्ष