लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांना मुंबईतील बेस्ट सेवेसाठी मुंबईला पाठविले जात आहे. गेल्या वर्षीचा वाईट अनुभव असल्याने कर्मचाऱ्यांतून याला विरोध होत आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी कर्मचारी नकारघंटा देत आहेत. असे असले तरी वरिष्ठांकडून याची कसलीच दखल घेतली जात नाही. याच सेवेसाठी गेलेल्या २८६ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे.
मुंबईतील बेस्ट सेवेसाठी राज्यातील सर्वच विभागातून चालक, वाहक, कर्मचारी यांना बोलावले जात आहे. सुरूवातीच्या काळात कर्मचारी गेले नाहीत. त्यामुळे रापमने त्यांच्यावर कारवाया केल्या. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी गुपचूप मुंबई गाठली. परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली असता आतापर्यंत २८६ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा ही सेवा सुरू झाल्याने बीड विभागातील २२० अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा पाठविण्यात आले आहे. १५ दिवस सेवा बजावल्यानंतर हे सर्व लोक बीड विभागात पुन्हा कर्तव्यावर रूजू होणार असल्याचे समजते. सेवा बजावत असले तरी त्यांना सेवा मिळत नसल्याने नकार घंटा असल्याचे बोलले जात आहे.
आष्टी आगारातील वाहकाचा कोरोनाबळी
आष्टी आगारातील एका वाहकाला कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्याची नोंद बीड कार्यालयाकडे झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी बीड विभागाकडून वरिष्ठांना प्रस्तावही पाठविल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
यापूर्वी एकवेळा मुंबईला ड्यूटी बजावली आहे. परंतु तेथे कसल्याच सुविधा मिळत नाहीत. भत्ताही पुरेसा मिळत नाही. परतल्यावर कोरोना चाचणी केली जाते. पॉझिटिव्ह आलेल्या लोकांशी ना संघटना बोलते ना प्रशासन. त्यामुळे खूप राग येतो. संघटनांचे प्रतिनिधी आणि अधिकारी हे एकमेकांचे मन सांभाळतात, असे एका वाहकाने बोलून दाखविले.
काय म्हणतात संघटना प्रतिनिधी
मुंबईला ड्यूटी नको, याबाबत आमच्या संघटनेकडे अद्यापतरी एकाही सदस्याने तक्रार केलेली नाही. तसेच पॉझिटिव्ह आल्यानंतरही कोणी सांगितले नाही. तक्रार आल्यास वरिष्ठांना याबाबत विचारणा केली जाईल, असे कामगार संघटनेचे अशोक गावडे यांनी सांगितले.
राज्यात सर्वत्रच लॉकडाऊन केले होते. परंतु मुंबईसाठी केवळ बीड विभागाच्याच लोकांची मागणी केली जाते. हा अन्याय आहे. या सेवेतून बीड विभाग वगळावा, यासाठी एमडीकडे पाठपुरावा सुरू असल्याचे कामगार संघटनेचे गणेश चव्हाण यांनी सांगितले.