बीड : मागील चार महिन्यांपासून शहरातील विविध २२ रस्ता कामांची ई-निविदा जाणीवपूर्वक स्थानिक लोकप्रतिनिधींनी अडविल्याचा आरोप करत नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. उपोषणकर्त्यांकडे धाव घेत आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे अश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभाग १ यांनी दोन निविदा प्रसिद्ध केल्या. यात बीड नगर परिषद हद्दीमधील एकूण २२ कामे घेतली. ही कामे जवळपास ११ कोटींची आहेत. दोन्ही निविदांचा कार्यारंभ आदेश ३१ मे २०२१ पर्यंत निर्गमित होणे अपेक्षित होते; परंतु नेहमीप्रमाणे सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी कार्यकारी अभियंता उमेश झगडे यांच्यावर दबाव टाकून ही ई-निविदा प्रक्रिया वैयक्तिक लाभासाठी जाणीवपूर्वक थांबवल्याचा आरोप करत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी शहरातील नागरिकांसह सोमवारी उपोषण केले. याची गंभीर दखल घेत अभियंता उपोषणस्थळी धावत आले. त्यांनी आठवडाभरात कारवाई करू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी गंगाधर घुमरे, मोईन मास्टर, शेख निजाम, नगरसेवक शेख इक्बाल, शेख अमर, भीमराव वाघचौरे, अशोक येडे, अंबादास जाधव, तुषार घुमरे, धनंजय गुंदेकर, संभाजी काळे आदींची उपस्थिती होती.
060921\06_2_bed_28_06092021_14.jpg
नगरसेवक अमर नाईकवाडे यांचे उपोषण सोडताना बांधकाम विभागाचे अधिकारी दिसत आहेत.