बीड : महाराष्ट्र जलसंजीवनी सौर ऊर्जा कृषिपंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्रूा तिघांना सायबर सेलने अटक केली. या भामट्यांनी यापूर्वी औरंगाबादेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना सुमारे ९६ लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींमध्ये व्हेटरनरी डॉक्टरचादेखील समावेश आहे.
किशोर विठ्ठल काळे (२८, रा.आपेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) , रोहिदास रामलाल कुसळकर (५२, रा.पैठणरोड नक्षत्रवाडी, औरंगाबाद) , संदीप लक्ष्मण गायकवाड (२८, रा.औरंगपूरवाडी, ता.पैठण, जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी गायकवाड हहा व्हेटनरी डॉक्टर असून, जून व ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी औरंगाबाद व परिसरातील बेरोजेगार २४ युवकांकडून पोस्ट खात्यात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून सुमारे ९६ लाख रुपये उकळले होते. मात्र, नंतर आश्वासन पूर्ण केले नाही. या प्रकरणात कुठलीही कारवाई झाली नाही, त्यामुळे किशोर काळेचा विश्वास वाढला.
औरंगाबाद पोलिसांची कुचराई नडली...डॉ. संदीप गायकवाड व रोहिदास कुसळकर याने बेरोजगारांकडून पैसे गोळा करुन किशोर काळेला दिले होते. पण नंतर त्याने मोबाइल बंद करून गायब झाला होता. बेरोजगार युवकांचा तगादा वाढल्याने डॉ. संदीप गायकवाड यानेच पुढाकार घेत औरंगाबादेत पोलीस आयुक्त, छावणी पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंतर काही युवकांचे पैसे परत करून त्यांना शांत करण्यात आले.बेरोजगारांकडून तक्रार करणारा डॉ. संदीप गायकवाडने पुढेदेखील किशोर काळे व रोहिदास कुसळकर यांच्याशी हातमिळवणी केली व शेतकऱ्यांना लुटण्यासाठी बनावट कृषी योजना आणली. दरम्यान, तेव्हाच औरंगाबाद येथील पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर ठोस कारवाई केली असती तर शेतकऱ्यांची फसवणूक टळली असती.
संबंधित आरोपींनी बनावट कृषी योजनेसाठी बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील ६७२ शेतकऱ्यांचे ९४७ फॉर्म भरून घेत ३३ लाख रुपयांची रक्कम उकळल्याची प्राथमिक माहिती आहे. याआधी बेरोजगारांनादेखील फसविल्याचे समजले आहे. त्यांच्या फसवणुकीला बळी पडलेल्यांनी पुराव्यानिशी तक्रार देण्यास पुढे यावे.- रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, बीड