बीड : जिल्हा रुग्णालयात आता चोरटे सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या कानातील बाळ्या चोरी प्रकरण ‘लोकमत’ने समोर आणताच सोमवारी बीड शहर ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी तत्काळ तपास हाती घेतला असता, रुग्णालयातील कॅमेरे बंद असल्याचे समोर आले. यामुळे आता येथील सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसते.
वडवणी तालुक्यातील बाबुराव सवासे या ६५ वर्षीय व्यक्तीवर कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे वॉर्ड क्रमांक ५ मध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या कानात सोन्याच्या बाळ्या होत्या, परंतु त्यांचा मुलगा दत्ता हा २९ डिसेंबर रोजी गेल्यानंतर त्याला त्या दिसल्या नाहीत. यावर त्याने शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला, तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडेही तक्रार देण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्हीकडेही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. हाच प्रकार ‘लोकमत’ने १६ जानेवारी रोजी वृत्त प्रकाशित करून समोर आणला. त्यानंतर, सोमवारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. तपास सहायक फौजदार बब्रुवाहन गांधले करीत आहेत.
तपास लावण्याचे आव्हान
कोरोना वॉर्डमध्ये चोरी झाल्याने चोरट्यांचे धाडस लक्षात येते. शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांच्या सूचनेनुसार कर्मचारी सुदर्शन सारणीकर व जोगदंड यांनी तपासाला सुरुवात केली. यात त्यांनी रुग्णालयातील वॉर्डमध्ये सीसीटीव्हीची विचारणा केली असता, ते बंद असल्याचे सांगण्यात आले. केवळ बाहेरच्या वऱ्हांड्यात कॅमेरे आहेत, अशा गुंतागुंतीच्या चोरी प्रकरणात तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.