बीड : आता प्रत्येक ठिकाणी रस्त्यांवर, चौकाचौकात चायनीज पदार्थांचे स्टॉल लागले आहेत. परंतु या पदार्थांना चव येण्यासाठी अजिनोमोटो अर्थात मोनो सोडियम ग्लूटामिटचा वापर केला जात आहे. याचा अतिवापर झाल्यास पोटाचे आजार होण्याची दाट शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. यासाठी चायनीज पदार्थ खाताना काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.
शहरात सध्या हॉटेल आणि हातगाड्यांची संख्या वाढली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरच चायनीज पदार्थ मिळू लागले आहेत. त्यांना अन्न प्रशासनाची कसलीही परवानगी नसते. तसेच स्वच्छतेचाही अभाव असतो. अशातच आता अजिनोमोटो अर्थात मोनो सोडियम ग्लूटामिटचा वापर करून चायनीज पदार्थांना चव आणली जात आहे. परंतु याचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. चायनीज खाणाऱ्यांना पोटाचे आजार होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पदार्थ खाण्यावर नागरिकांसह मुलांनी अधिक भर देण्याची गरज आहे.
--
काय आहे अजिनोमोटो?
कोणत्याही पदार्थाला चव येण्यासाठी अजिनोमोटो हा घटक वापरला जातो. ०.५ ग्रॅमपर्यंतच याचा वापर झाल्यास सुरक्षित असते, त्यापेक्षा जास्त वापर झाल्यास आजार वाढण्याची शक्यता असते. तसेच गरोदर माता आणि ज्यांना अजिनोमोटो पदार्थाची ॲलर्जी आहे, त्यांनी हे खाणे टाळावे. जास्त खाल्ल्यास आजारांना निमंत्रण मिळेल, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.
---
काय म्हणतात डॉक्टर....
हाडांची घनता कमी होणे, डोकेदुखी, झटके येणे, घाम येणे, चेहऱ्यावर ताण येणे, छातीत दुखणे, धडधड करणे, मळमळ होणे, डायरिया, आळस येणे, पोटात जळजळ होणे, हातापायाला मुंग्या येणे, अशी लक्षणे जाणवण्याची दाट शक्यता असते.
डॉ. नरेश कासट, तालुका वैद्यकीय अधिकारी, बीड
---
चायनीज पदार्थात केमिकलचा वापर न झाल्यास काहीच त्रास होत नाही. परंतु वापर झाल्यास संडास लागणे, पोटदुखी, उलटी होणे असा त्रास होतो. कोणताही पदार्थ खाताना लिमिटमध्ये खावे. काही लक्षणे जाणवत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
डॉ. महादेव चिंचोळे, वैद्यकीय अधीक्षक, गेवराई