बीड : नैसर्गिकरीत्या उगवलेल्या रानभाज्या या मानवी आहारात सर्रासपणे वापरल्या जात होत्या. मात्र, काळानुसार या रानभाज्यांचा वापर कमी होत असल्याचे चित्र आहे. या रानभाज्यांमुळे अनेक प्रकारचे फायदे असून, याची ओळख व्हावी यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी रानभाज्यांची ओळख करून देण्यासाठी प्रदर्शन भरवले जात आहे.
या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?
कुर्डूची भाजी
हे एक प्रकारचं तण असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुर्डू जातीची पालेभाजी दिसू लागते. कुर्डू पालेभाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.
चिवळची भाजी
ही पावसाळ्यात शेतात दिसते, चिवळची भाजी खाल्ल्याने रक्तपित्तात ही भाजी प्रशस्त तर ज्वरात पथ्यकर आहे. तसेच शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.
टाकळ्याची भाजी
टाकळ्याची भाजी दिसायला मेथीच्या भाजीसारखीच दिसते. रानोमाळ टाकळ्याची भाजी गवताबरोबर पसरलेली आपण पाहू शकतो. ठाणे, मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडीसारखी ही भाजी घेता येते.
पाथरीची भाजी
पाथरी शेतातील पिकांमध्ये आढळून येते. पाथरीची भाजी शेतातील जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खातात.
हादगा
हादग्याच्या झाडाची वाढ ३० फुटापर्यंत होते. त्याची फुले, शेंगाची भाजी केली जाते. फुले गुणाने थंड आहेत, त्यामुळे त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरिता, तसेच कफ व पित्तदोषही साम्यावस्येत आणण्यासाठी हादग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो.
या रानभाज्या झाल्या गायब
आघाडा
या भाजीमध्ये 'अ' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आढळते; ही भाजी 'पाचक' असून मूतखडा, मूळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे. आघाडा रक्तवर्धक आहे व हाडे बळकट होण्यासाठी तो खाल्ला जातो. मात्र, आहारातून ती गायब झाली आहे.
करटोली
रक्तशर्करा नियंत्रित करण्यासाठी करटोली गुणकारी आहेत. या फळभाजीमध्ये खूप बिया असतात. मात्र, ही भाजी चवीला चांगली असते, मात्र भाजी करण्याची कृती माहिती नसल्याचे चित्र आहे.
शक्तिवर्धक रानभाज्या
पावसाळ्यातीन रानभाज्या या आहारात असणे गरजेचे आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या रोगांवर परिणाम होत असून, सर्व भाज्या या शक्तिवर्धक आहेत. याचीच माहिती व्हावी यासाठी जिल्हाभरात रानभाजी ओळख व पाककृती प्रदर्शन राबवले जात आहे. नागरिकांनी सहभागी व्हावे.
-दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड