केज (जि. बीड) : तालुक्यातील नांदुरघाट जिल्हा परिषद गटामध्ये शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास निधीच्या रकमेत भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करीत ‘ईडीने थोडं लक्ष आमच्या नांदूरघाट सर्कलमध्येपण घालावं’, असे साकडे घालणारे बॅनर मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी नांदूरघाट (ता.केज) जिल्हा परिषद गटातील गावागावात लावले आहेत. या माध्यमातून विकास निधीच्या कामात केलेल्या भ्रष्टाचाराकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
राज्यात ईडीने राजकीय नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करत आहे. ग्रामीण भागातही काही लहान-मोठे नेतेही भ्रष्टाचार करत असल्याने याकडे ईडीचे लक्ष वेधण्यासाठी व संबंधित संशयितांवर कारवाईसाठी मनसेच्या वतीने हे बॅनर लावले आहेत. नांदूरघाट जि.प. गटामध्ये मागील ५ वर्षांत विकासकामे करण्यासाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शासनाने मंजूर केला. मात्र, या निधीचा योग्य विनियोग केला नसल्याने या विकास निधीतून केलेल्या कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी केला आहे.
नांदूरघाट जि.प. गटातील गावागावांत लावलेल्या बॅनरवर नांदूरमध्ये ६०० मीटर सिमेंट रस्त्यासाठी ५ कोटी खर्च करूनही कामात दर्जा नाही व काम अपूर्ण आहे. या गटातील जि.प. सदस्याचा कोणता व्यवसाय आहे, ज्यातून २ कोटींचे घर व कोट्यवधींची माया जमविली आहे? की हा पैसा भ्रष्टाचाराचा आहे? असा सवाल या बॅनरद्वारे केला आहे.
बॅनरबाजीची सर्वत्र चर्चा
- नांदूरघाट जिल्हा परिषद गटात विकासकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही विकासकामे झाली नसल्याने या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांच्याकडे करणार असल्याचे धस यांनी सांगितले.
- भ्रष्टाचाराच्या तक्रारीचे गावागावात लावलेल्या बॅनरची ईडी दखल घेईल का? याचे उत्तर सध्या अनुत्तरित असले तरीही या बॅनरबाजीबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.