- मयूर देवकर
अंबाजोगाई : नैतिक मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार मराठवाडा साहित्य संमेलनातील दुसर्या परिसंवादातून समोर आला.
ग.दि. पहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ‘१९७५ नंतरच्या शिक्षणातून नैतिक मूल्ये गायब झाली आहेत!’ या परिसंवादात नवनाथ तुपे, भारत काळे, वृंदा देशपांडे, गणेश मोहिते आणि शशिकांत पाटील यांनी सहभाग घेतला. आजच्या शिक्षणपद्धतीचे विश्लेषण करताना शशिकांत पाटील यांनी पुस्तकी शिक्षण कसे कुचकामी ठरतेय हे सांगितले. ‘आज आपण विद्यार्थ्याला पुस्तकी आणि केवळ माहिती देणारे शिक्षण देतोय. ज्ञानार्जनाची वृत्ती त्यामध्ये नाही. केवळ पैसा कमविण्यासाठी शिक्षण घेतले जात असल्याने नैतिक मुल्ये रुजण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणजे विद्यार्थ्याला स्वावलंबी करणारे शिक्षण हवे,’ अशी त्यांनी मांडणी केली.
गणेश मोहिते म्हणाले की, शाळेत स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी आणि घरी आईबहिणीला मिळणारी दुय्यम वागणूक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे देणारे शिक्षकच जेव्हा नवरात्रीदरम्यान नऊ दिवस अनवाणी शाळेत येऊ लागतात तेव्हा विद्यार्थ्यांना काय नैतिकता शिकवायची? त्यामुळे हरवणार्या मूल्यांसाठी शिक्षणाला जबाबदार ठरविण्याऐवजी समाजाचे होणारे पतन रोखणे गरजेचे आहे. समाजातील दांभिकपणावर आसूड ओढून समाजाची वर्तणूक बदलणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार एल्लावाड यांनी केले तर बालाजी कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
व्यवसायाला नैतिकता का असू नये?१९७५ नंतर १०+२+३ अशी शिक्षणरचना स्वीकारल्यानंतर शिक्षणाचे बाजारीकरण वाढले. बारावीनंतरच्या शिक्षणाचे महत्त्व वाढल्याने खासगी क्लासेसची समांतर शिक्षणपद्धती फोफावली.शिक्षणातून नैतिक मूल्ये नाही तर प्रेरणा गायब झाली. संस्थाचालक राजकीय प्रेरणेतून शिक्षणसम्राट झाले.शिक्षणाचा बाजार मांडला गेला. पण व्यवसायाला नैतिकता का असू नये? असा सवाल वृंदा देशपांडे यांनी उपस्थित केला.