लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : अवघे जगच बॉर्डरलेस करून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोरोना महामारीचा प्रभाव पोहोचलेला आहे. या महामारीच्या प्रभावातून एकही व्यक्ती, समाज, समूह, देश सुटलेला नाही. याचा परिणाम केवळ आर्थिक गोष्टींवर झाला आहे असे नव्हे, तर संपूर्ण मानवावर झालेला दिसून येत आहे, असे मत प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी व्यक्त केले.
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुवर्णमहोत्सवी वर्षाच्यानिमित्ताने रसायनशास्त्र विभागाच्यावतीने ‘केमिकल्स सायन्सेस डिझाईन सिनथेसिस व ॲप्लिकेशन’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र ऑनलाईन पार पडले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. शिरसाठ बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक विनायकरावजी पाटील, रामरावजी आवरगावकर, सुंदररावजी सोळंके यांच्या पावनस्मृतीस अभिवादन केले. रसायनशास्त्राचे विभागप्रमुख व संयोजक डॉ. गोपाळ काकडे यांनी विषय व त्याची निकड याविषयी माहिती दिली. प्रा डॉ. बापूराव शिंगटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. मनोहर लोंखडे, प्रा. डॉ. हितेंद्र पटेल यांनी रसायनशास्त्रातील नावीन्यपूर्ण बदलांविषयी माहिती दिली. चर्चासत्रात १८७ जणांनी सहभाग घेतला. उपप्राचार्य मेजर मिलिंद गायकवाड, प्रा. महादेव जोगडे यावेळी उपस्थित होते. गोपाळ सगर यांनी आभार मानले. तंत्रसहाय्य प्रा. ए. आर. गाडे यांनी केले.