दिंद्रुड (बीड): नातेवाईकांच्या भेटीसाठी बसने मुंबईहून माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे निघालेली ८२ वर्षीय वयोवृद्ध महिला दोन दिवसांपूर्वी हरवली होती. मात्र, सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने या ८२ वर्षीय वृद्धेची अन तिच्या मुलाची आज सकाळी भेट झाली. रमाबाई बाबुराव पाटील असे वृद्ध महिलेचे नाव आहे. सोशल मिडीयाच्या प्रभावी वापराने अवघ्या दोन तासांत वृद्धेची माहिती मिळून नातेवाईकांची भेट झाली.
रमाबाई पाटील या १९८० साली दिंद्रुडहून मुंबईला राहायला गेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी दिंद्रुड येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी रमाबाई पनवेल येथून बसने माजलगावकडे निघाल्या. माजलगाव गाडीत बसलेल्या रमाबाई मात्र दिंद्रुडला पोहचल्याच नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोधा शोध केली मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने संपर्क करण्यात अडचण आली.
दरम्यान, मुंबई येथील कामोठा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना गुरुवारी सकाळी रमाबाई आढळून आल्या. पोलिसांनी माहिती विचारली असता त्यांस सांगता आली नाही. मात्र, त्यांच्याजवळ पनवेल ते माजलगाव व माजलगाव ते दिंद्रुड असे एसटी बसचे तिकीट सापडले. या तिकिटावरून कामोठा पोलिसांनी दिंद्रुड पोलिसांशी संपर्क साधला. दिंद्रुड पोलिसांनी रमाबाई यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला. याबाबत पोलिसांनी स्थानिक पत्रकारांना माहिती दिली.
दिंद्रुड येथील पत्रकार संतोष स्वामी, नवनाथ कांबळे, गणेश काटकर यांनी सोशल मीडियाचा माध्यमातून अवघ्या दोन तासांत रमाबाई यांच्या दिंद्रुड येथील नातेवाईकांचा शोध लावला. योगेश राडकर व अमोल नागापुरे या नातेवाईकांनी लागलीच त्यांच्या मुलाचा व मुलीचा संपर्क देत पत्ता सांगितला. त्यानंतर पोलिसांनी मुलगा प्रशांत पाटील याच्यासोबत संपर्क केला. कामोठा पोलिसांनी रमाबाई यांना मुलाकडे सोपवले. पाटील परिवाराने कामोठा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल आगलावे, दिंद्रुड पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल बालाजी सूरेवाड तसेच दिंद्रुड येथील पत्रकारांचे आभार व्यक्त केले.