परळी : शहरातील एका महिलेस गंगाखेड तालुक्यातील बडवणी येथील एका इसमाने वारंवार धमकावून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच विश्वास संपादन करून ८ लाख ६० हजार रुपयांना फसविल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून गुरुवारी अर्जुन बाबूराव मुंडे यास अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका महिलेसोबत जुलै २०१८ ते ६ एप्रिल २०२१ दरम्यान परळी व गंगाखेड येथे धमकावून अर्जुन मुंडे याने वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या महिलेकडून विश्वासाने आठ लाख रुपये व दोन तोळ्याच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असे मिळून ८ लाख ६० हजार रुपये घेतले, तसेच ते परत देण्यास नकार दिला व उलट काठीने मारहाण करून जखमी केले, अशी फिर्याद या महिलेने परळी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार ७ एप्रिल रोजी आरोपीविरुद्ध संभोग करणे व फसविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ८ एप्रिल रोजी परळी शहर पोलिसांनी अटकेची कारवाई केली.पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात हे तपास करीत आहे.