शिरूर कासार : तालुक्यातील लोणी शिवारात शुक्रवारी मृत झालेल्या पाच मोरांच्या मृत्यूबाबत अहवाल आलेला नसताना शनिवारी पुन्हा आठ मोरांचा मृत्यू झाला. दोन दिवसात १३ मोर, एक होला व दोन चित्तर पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पशुसंवर्धन उपायुक्त बीड डॉ. रवी सुरेवाड, शिरूरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
शुक्रवारी लोणी शिवारात पाच मोरांच्या मृत्यूची कारणमीमांसा शोधण्यासाठी वनरक्षक बद्रीनाथ परझणे, वनमजूर शिवाजी आघाव, तसेच वन्यजीव अभ्यासक तथा सर्पराज्ञी प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणे गेले होते. पाहणीनंतर निष्कर्षावर येत नाहीत तोच शनिवारी आठ मोरांच्या मृत्यूने चिंतेचे सावट पसरले आहे.
तालुक्यात आतापर्यंत २१ कावळे, तीन चिमण्या, दोन होला, दोन चित्तर पक्षी व दोन दिवसांत तेरा मोरांचा मृत्यू झाला आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सायमा पठाण यांच्याशी संपर्क साधला असता मोरांच्या मृत्यूचे कारण अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. तूर्त वनपरिक्षेत्रात तसेच नायगाव मयूर अभयारण्यात गस्त वाढवली जाईल, असे त्यांनी सांगितले.