लाभार्थ्यांची अस्पष्ट यादी चिटकविली भिंतीवर
यादीत नाव शेधण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी
अंबाजोगाई : शासनाने मंजूर केलेल्या यादीत आपल्या नावाचा समावेश झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी वृद्ध, निराधार व दिव्यांगांची मोठी गर्दी तहसील कार्यालयात झाली आहे. मात्र, तहसील कार्यालयाने भिंतीवर चिकटवलेली यादी खूपच अस्पष्ट असल्याने नावही नीट दिसत नाही. विचारायला गेले तर कोणी नीट सांगतही नाही. परिणामी लाभार्थींची मोठी कुचंबणा होऊ लागली आहे.
शासनाने वृद्ध, निराधार व दिव्यांग व्यक्तींना अर्थसाहाय्य करण्यासाठी संजय गांधी निराधार समितीच्या माध्यमातून अशा लाभार्थींना मासिक अनुदान देण्याची योजना पूर्वीपासूनच कार्यान्वित केली आहे. मात्र, या योजनेत सातत्याने नवीन लाभार्थींचा समावेश केला जातो. तहसीलदार व योजनेच्या समितीच्या माध्यमातून अशा लाभार्थींची निवड दर तीन ते चार महिन्यांनी होते. या योजनेत समावेश व्हावा, यासाठी हजारो अर्ज दाखलही होतात. या अर्जांची छाननी करून लाभार्थींची निवड केली जाते. अंबाजोगाई तालुक्यात आठवडाभरापूर्वीच अशा १६०० व्यक्तींची निवड झाली आहे. ही निवड झाल्यानंतर तहसील कार्यालयाने लाभार्थींची निवड झालेली यादी तयार करून तहसील कार्यालयाच्या भिंतीवर चिकटवली आहे. मात्र, चिकटवली गेलेली यादी खूपच अस्पष्ट आहे. या यादीतील नावे नीट वाचताही येत नाहीत. जर कार्यालयात कोणाला विचारले तर नीट उत्तरही मिळत नाही. अशा स्थितीत या वृद्ध निराधारांची मोठी उपेक्षा होते. या अनुदानाच्या यादीत आपला समावेश आहे की नाही, हे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र, अनेकांना यात आपला समावेश झाला की नाही, हे समजणेही मोठे जिकिरीचे काम झाले आहे.
वृद्ध, निराधार, दिव्यांगांची गैरसोय दूर करा
अंबाजोगाई शहर व कार्यालयातील अनेक वृद्ध, निराधार, दिव्यांग महिला व पुरुष या निराधार योजनेच्या यादीत आपला समावेश आहे की नाही, हे पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. मात्र, यादीच अस्पष्ट असल्याने नावेही ओळखू येईनात. परिणामी लाभार्थींची मोठी गैरसोय झाली आहे, ही गैरसोय दूर करावी.
-विजय कोंबडे, सामाजिक कार्यकर्ते, अंबाजोगाई.
या संदर्भात अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक अडचणीमुळे यादी अस्पष्ट आली असेल. उद्या ती यादी नव्याने स्पष्ट स्वरूपात चिकटवून झालेली गैरसोय दूर केली जाईल.
-विपीन पाटील, तहसीलदार, अंबाजोगाई.
270721\img-20210727-wa0074.jpg
वृद्ध ,निराधार व दिव्यांग यांना निराधार योजनेची यादी ही स्पष्ट दिसेना