परळी : मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया शिबिरासाठी आलेल्या एका वृद्ध रुग्णाचा इतर रुग्णांसोबत गप्पा मारत असताना गुरुवारी रात्री अचानक मृत्यू झाल्याची घटना येथील उपजिल्हा रुग्णालयात घडली. ज्ञानोबा शंकर ताटे (65 ) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कोठळा येथील ज्ञानोबा ताटे हे गुरुवारी सकाळी 11.25 वाजेच्या सुमारास परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोतिबिंदू नेत्र शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले.शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती.परंतु गुरुवारी मध्यरात्रीनंतर २ वाजेच्या सुमारास त्यांचा अचानक मृत्यू झाला. यानंतर उपजिल्हा रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले.
याची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती. यासंदर्भात परळी उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. रामेश्वर लटपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी दाखल झालेले रुग्ण ज्ञानोबा ताटे यांचा इतर रुग्णांसोबत गप्पा मारत असताना अचानक मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, शुक्रवारी १२ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली.