बीड : मुलाकडील उचलीच्या पैशासाठी वृद्ध पित्यास जबरदस्तीने वाहनात बसवून अपहरण केले. ही घटना १ डिसेंबरला घोसापुरी (ता. बीड) शिवारात घडली. याबाबत सुनेच्या दोन भावांसह पाच जणांवर गुन्हा नोंद झाला. जगन्नाथ सोनाजी गायकवाड (६५, रा. आहेर धानोरा, हमु. घोसापुरी, ता. बीड) असे अपहृत व्यक्तीचे नाव आहे. ते घोसापुरी येथे मुकुंद कदम यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात.
त्यांचा मुलगा दत्ता याने त्याचा मेहुणा राजू साळवे याच्या मध्यस्थीने उचल घेतली होती. तो तीन महिन्यांपूर्वी कर्नाटकात पत्नीसह ऊसतोडीसाठी गेलेला आहे. दरम्यान, ३० नोव्हेंबरला जगन्नाथ यांची पत्नी नंदा गायकवाड या भाजीपाला विक्रीसाठी बीडला आल्या होत्या, तर जगन्नाथ हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी सुनेचे भाऊ राजू साळवे, युवराज साळवे (दोघे रा. गुंधावडगाव, ता. बीड), विकास राऊत (रा. काळेगाव हवेली) व दोन अनोळखी तेथे आले. त्यांनी तुमचा मुलगा आठ दिवसांपासून ऊसतोडीच्या कामाला नाही. उचलीचे पैसे द्या, नाहीतर तुम्ही ऊसतोडीसाठी चला, असे म्हणत होते. यावेळी शेतमालक कदम यांनी मध्यस्थी करून चर्चा करून व्यवहार मिटवू, असे सांगितले. त्यानंतर १ डिसेंबरला ते सर्व जण परत आले आणि त्यांनी बळजबरीने जगन्नाथ गायकवाड यांना जीपमध्ये बसवून पळवून नेले.
म्हणे, काय करायचे ते करादरम्यान, शेतमालक कदम यांनी विकास राऊत यांना फोन करून विचारले असता आम्ही त्यांना कारखान्यावर घेऊन जात असून, तुम्हाला काय करायचे ते करा, असे म्हणत धमकावले. याबाबत बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी फरार असून, शोध घेणे सुरू असल्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे यांनी सांगितले.