बीड : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दाखविण्यात आलेल्या खर्चात पुन्हा तफावत आढळून आल्याने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी नोटीस काढली आहे. मुंडे व सोनवणे यांनी पहिल्या नोटीसला उत्तर दिल्यानंतर आता पुन्हा खर्चात तफावत आढळली आहे. तसेच, अन्य तीन उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी गैरहजर असल्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.
बजरंग मनोहर सोनवणे यांनी ३ ते ६ मे पर्यंत सादर केलेल्या एकूण खर्चाची रक्कम ४ लाख ७५ हजार ३८१, एवढी असून खर्च निरीक्षक कार्यालयाच्या छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार नोंदविण्यात आलेल्या एकूण खर्च रक्कम ९ लाख ३ हजार ३१८ एवढी आहे. यामध्ये छायांकित नोंदवहीनुसार झालेल्या खर्चाचा विचार करता उमेदवाराकडून ४ लाख २७ हजार ९३७ त्यांच्या लेख्यात कमी दर्शविलेली आहे. पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी २ ते ५ मे पर्यंत सादर केलेल्या एकूण खर्चाची रक्कम ३ लाख १५ हजार ७१८ आहे. तर कार्यालयाच्या छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार नोंदविण्यात आलेल्या एकूण खर्चाची रक्कम ७ लाख ४३ हजार ३२७ आहे. छायांकित नोंद वहिनुसार झालेल्या खर्चाचा विचार करता उमेदवाराकडून ४ लाख २७ हजार ६०९ रक्कम त्यांच्या लेखात तफावत दर्शविली आहे.
तसेच करुणा धनंजय मुंडे, ताटे महेंद्र अशोक, सलीम अल्लाबक्ष सय्यद या तीन उमेदवारांना निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीसाठी सादर करण्यात कसूर केल्याबद्दल नोटीस जारी केली आहे. उमेदवाराने स्वतः अथवा प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत ४८ तासांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशेब विलंबाच्या कारणासह सादर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी नोटीस जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संबंधित उमेदवारास जारी केली आहे.