माजलगाव : बीड जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या बँकेसाठी मतदार असलेल्या माजलगाव तालुक्यातील तब्बल १३० विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका मागील दोन वर्षांपासून रखडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. मुदत संपल्यानंतर त्याच विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या निवडणुका घेतल्या असत्या तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नूतन पदाधिकाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला असता, अशी चर्चा करण्यात येत आहे.
माजलगाव येथील सहायक निबंधक कार्यालयांतर्गत तालुक्यातील १८१ सहकारी संस्थांची नोंदणी आहे. यापैकी तब्बल १३० संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. यात २९ सेवा सहकारी सोसायट्यांचा समावेश आहे. डिसेंबर २०१९ पूर्वी ४० सहकारी संस्थांची मुदत संपलेली होती. त्या संस्थांची निवडणूक घेण्याची संधी असताना दुर्लक्ष करण्यात आले, तसेच उर्वरित ९० संस्थांची मुदत कोरोनाच्या काळात संपलेली आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. माजलगाव तालुक्यात एकूण ४८ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमधील २९ सेवा सहकारी सोसायट्या निवडणुकीला पात्र आहेत. त्याचबरोबर ५३ सहकारी पतसंस्था असून, २८ मजूर सहकारी संस्थांचीही मुदत संपलेली आहे. औद्योगिक सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, अभिनव सहकारी संस्था आणि सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था मिळून ४८ संस्थांची मुदत संपली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक चुरशीची बनत चालली आहे. या बँकेच्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायट्यांचे चेअरमन, नागरी बँका, पतसंस्थांसह इतर सहकारी संस्थांचे मतदान असते. त्याच्यासाठी राखीव जागाही ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, यात मतदानाचा हक्क मुदत संपलेल्या पदाधिकाऱ्यांनाच बजावता येणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचाही हिरमोड झाल्याचे दिसून आले.
कोणत्या महिन्यात होणार होत्या निवडणुका
१ जानेवारी ते ३१ मार्च २०२० दरम्यान ४८ संस्था, १ एप्रिल ते ३० जून २०२० दरम्यान २९, १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान ९ आणि १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२० दरम्यान ४० संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. मात्र, त्या झालेल्या नाहीत.
कोट
डिसेंबरअखेरीस निवडणुकीसाठी पात्र ४० संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील याद्या मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच याठिकाणी निवडणुका घेण्यात येणार आहेत.
-व्ही.एल. पोतंगळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, माजलगाव