लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आम्ही हा विकास करु तो विकास करु असे म्हणण्याचे दिवस गेले आहेत. या पुढील काळात केवळ अश्वासनावर निवडणूका लढवता येणार नाहीत. आधी काम करा मगच बोला असे जनता बोलत आहे. त्यामुळे नेत्यांना प्रत्यक्षात आधी कामे करावी लागणार आहेत. जिल्ह्याच्या विकास कामात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले. संसदेत मागणी केल्यानंतर बीड येथे पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी कसरत करावी लागली. आजारी असतानाही परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली. त्यामुळे सुरु झालेल्या या सुविधेचा जनतेला लाभ होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
येथील राजूरी वेस परिसरातील डाकघर कार्यालयात गुरूवारी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि.प अध्यक्षा सविता गोल्हार, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, माजी आ. आदिनाथराव नवले, विजयकुमार पालसिंगणकर, संतोष हंगे, रमेश पोकळे, सलीम जहांगीर, डाक पासपोर्ट कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अनंत ताकवाले, प्रणव कुमार, एस.एन. शास्त्री, कोळी आदी उपस्थित होते.
या वेळी नगराध्यक्ष क्षीरसागर म्हणाले, स्व. खा. केशर काकू व स्व. गोपीनाथ मुंडे हे बीडच्या विकासासाठी राजकारण दूर करून एकत्र येत होते. रेल्वेच्या कामाचे स्वप्न हे खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. क्षेत्रीय अधिकारी ताकवले म्हणाले, पासपोर्टसाठीच्या अटी, नियम, कागदपत्र शिथिल केले आहेत. बीड मधील जनतेने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक प्रणवकुमार यांनी केले. सूत्रसंचालन डाक अधिकारी नरके यांनी केले.
खेळण्यातील इंजिन तरी आणले का ?बीड रेल्वेचे काम हे प्रगतीपथावर आहे, या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न काही विघ्नसंतोषी लोक करत आहेत. मावेजाच्या नावाखाली ते दिशाभूल करत आहेत. रेल्वे भूसंपादनात सामान्य शेतकºयांवर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल . मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून हे असले प्रक ार करू नयेत. जे आरोप करत आहेत, त्यांनी खेळण्यातील इंजिन तरी बीडसाठी आणले का असा खोचक टोला खा. मुंडे यांनी विरोधकांना लगावला.
कार्यकर्त्यांची भाऊगर्दी, राजशिष्टाचाराचा विसरकोणत्याही केंद्रीय किंवा राज्य पातळीवरील शासकीय कार्यक्रमाचा राजशिष्टाचार असतो. मात्र कार्यकर्त्यांच्या भाऊ गर्दीमुळे राजशिष्टाचाराचा विसर अधिकारी तसेच नेत्यांना पडल्याचे या कार्यक्रमात दिसून आले.