लव्हुरी-कानडीमाळी रस्ता काम निकृष्ट
बीड : केज तालुक्यातील लव्हुरी-कानडीमाळी या राज्य मार्गाचे ५ कि.मी. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. अत्यंत दर्जाहीन काम सुरू असून, दर्जेदार काम न केल्यास या विरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामावर कंत्राटदाराकडून या रस्त्यावर केवळ थातूरमातूर खडी टाकून डांबर न वापरता बारीक कचखडी टाकून दबाई केली जात आहे.
कोंडवाडा
दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बीड : मोकाट गुरांना कोंडण्यासाठी पालिकेच्या मालकीचा कोंडवाडा आहे; परंतु त्याची अवस्था खराब झालेली आहे. मागील अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. कोंडवाडा दुरुस्त करून मोकाट गुरांना त्यात कोंंडावे, अशी मागणी होत आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
बोभाटी नदीपात्रातून रात्री वाळू उपसा सुरू
बीड : केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील बोभाटी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा व वाहतूक दिवस-रात्र सुरूच आहे. शनिवारी दोन ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. याबाबत पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तरी या ठिकाणाहून रात्री उशिरा वाळू उपसा सुरूच आहे. या अनधिकृत वाळू उपशावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.