लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कोटेशन घेतले परंतु घरात मिटर कनेक्शन घेतलेच नाही. तरीही एका ग्राहकाला तब्बल १७ हजार रूपयांचे वीज बील आले आहे. हा प्रकार वडवणी तालुक्यातील उपळी येथे घडला आहे. या प्रकाराने महावितरणचा गलथान प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.माधव तुकाराम सौंदरमल (रा.उपळी ता.वडवणी ह.मु.क्रांतीनगर बीड) असे या ग्राहकाचे नाव आहे. माधव यांनी १८ फेब्रुवारी २०१५ रोजी घरगुती मिटरसाठी तेलगाव येथील उपविभागीय कार्यालयात कोटेशन भरले होते. त्यानंतर ते बीडला आले. त्यांच्या गावातील घरी कोणीच राहत नव्हते. त्यामुळे मिटर घेतलेच नाही. काही महिन्यांपूर्वी ते पुन्हा गावात राहण्यासाठी जाणार असल्याने त्यांनी मिटरची मागणी केली. यावेळी त्यांच्या नावावर १७ हजार ३४० रूपये वीज बील प्रलंबीत असल्याचे दिसले. हे बील पाहून माधव यांना धक्काच बसला.माधव यांनी याबाबत तेलगाव, बीड कार्यालयात रितसर तक्रारी केल्या. मात्र, संबंधित अभियंता व लाईनमॅनने याची दखल घेतलीच नाही. विशेष म्हणजे वीज बिलावर रिडींगही शुन्यच आहे. तसेच मिटर क्रमांकही नसल्याचे समोर आले आहे. अनेकवेळा खेटे मारूनही दुरूस्ती होत नसल्याने त्यांनी आता न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. या निमित्ताने महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.माधव सौंदरमल हे गावात राहतच नाही. केवळ कोटेशन त्यांनी घेतलेले आहे. मिटर त्यांच्या घरात बसलेच नाही. मग हे १७ हजार रूपयांचे बील आलेच कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून महावितरणचा कारभार हा मनमानी असल्याचे स्पष्ट होत आहे.
कनेक्शन नसताना १७ हजारांचे वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:33 AM