परळी (बीड ) : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या 250 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सात मधून वीज निर्मितीस बुधवारी रात्री 11.55 वाजता सुरूवात झाली. गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता 168 मेगावॅटची वीज निर्मिती झाली. या संचातुन 205 मेगावॅट पर्यंत वीज निर्मिती होत असून 250 मेगावॅट क्षमतेएवढी वीज निर्मिती संच क्रमांक 7 मधून होईल असे सूत्रांनी सांगितले.
यासोबतच 250 मेगावॅट संच क्रमांक 6 ही सुरू करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. संच क्रमांक 6 मधून दोन दिवसात वीज निर्मिती सुरू होऊ शकते असे सांगण्यात येते तर 250 मेगावॅटच्या संच क्रमांक 8 चे देखभालदुरुस्तीची काम काढण्यात आले आहे. या तीन ही संचास लागणारा दगडी कोळसा साठा 25 दिवस पुरेल एवढा येथील विद्युत केंद्रात शिल्लक आहे.
पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी दि.11 ऑगस्ट रोजी दुपारी येथील नवीन परळी औष्णिक केंद्राच्या वीज निर्मितीसाठी सोडण्यात आले. हे पाणी विद्युत केंद्राच्या खडका (ता सोनपेठ) बंधाऱ्यात सोमवारपासून पोहचणे सुरू झाले आहे. मंगळवारी खडक्यातील पाणी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या रो वॉटर टॅंक मध्ये आले आणि संच क्रमांक 7 हा सुरू करण्यात आला. बुधवारी रात्री 11.55 वाजेला संचातून वीज निर्मितीस प्रारंभ झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील वीज संच बंद ठेवल्याने वीजनिर्मिती ठप्प झाली होती. आता पुन्हा वीज निर्मितीस सुरुवात झाली आहे त्यामुळे परळीच्या बाजारपेठेत समाधान व्यक्त केले जात आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात 250 मेगावॅटचे 6,7,8 हे तीन संच असून याची एकूण क्षमता 750 मेगावॅट एवढी आहे.