बीड : शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी सरकारविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी दुपारी विराट मोर्चा काढण्यात आला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघालेल्या या मोर्चात जिल्ह्याच्या कानाकोप-यातून शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतक-यांची सरसकट कर्जमाफी तातडीने करून त्यांचा ७/१२ तातडीने कोरा करावा, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून मदत द्यावी, भारनियमन तातडीने बंद करावे, बायपास रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे, गतवर्षीच्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, खरीप हंगामातील पीक विमा शेतक-यांना तातडीने वाटप करावा, महागाई कमी करावी, पेट्रोल-डिझेल दरवाढ मागे घ्यावी, पेट्रोल-डिझेलवरील सर्व कर हटवून त्यावर जीएसटी लावून विक्री करावी, शेतक-यांचे ट्रॅक्टर, शेती अवजारांना जीएसटीमधून सूट द्यावी, शेतक-यांच्या शेतातील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करावे, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व बारा बलुतेदार यांचे सरसकट कर्ज माफ करावे, मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्यावी, शेतीमालाला हभी भाव द्यावा, खरेदी केंद्र सुरू करावे, यासारख्या प्रमुख मागण्यांना घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. धनंजय मुंडेंसह इतर नेत्यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी सर्वांनीच भाजप सरकारवर कडाडून टीका केली.
यावेळी धनंजय मुंडेंसह माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, आ. अमरसिंह पंडित, माजी आमदार उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रेखा फड, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे आदींची प्रमुख उपस्थिती होती.मोर्चानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा चौका-चौकात तैनात केला होता.