- संजय खाकरेपरळी (बीड) : शहराला पाणी पुरवठा करणारे तालुक्यातील नागापूर येथील वाण मध्यम धरण शुक्रवारी सकाळी ११.४५ वाजता १०० टक्के भरले. पाणी धरणाच्या सांडव्यावरून वाहण्यास सुरूवात झाली आहे. धरण भरून जलसंकट दूर झाल्याने परळीकरांनी समाधान व्यक्त केले. तसेच वाण धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांना शेतीसाठी पाण्याची सोय झाली आहे.
१९६६ मध्ये बांधकाम पूर्ण झालेल्या परळी तालुक्यातील नागापूर वाण धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता 19.72 द.ल.घ.मी एवढा आहे. धरणातील लाभक्षेत्रातील गावांमध्ये परळी तालुक्यातील नागापूर, माळहिवरा, मांडेखेल, तळेगाव, तडोळी, भिलेगाव, परचुंडी, लिंबूटाचा समावेश आहे. परळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूरच्या वाण धरणात पावसाच्या पाण्याची आवक गेल्या दहा दिवसांपासून सुरू झाली आणि आज सकाळी हे धरण पूर्ण भरले. उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी घटल्याने परळीनगर परिषदेने शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा चालू होता. शहरात सुधारित पाणीपुरवठा करण्याचे नियोजन लवकरच नगरपालिकेला करावे लागणार आहे. दरम्यान नागपूर धरण भरल्याने परळी शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आश्विन शंकरआप्पा मोगरकर यांनी मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
धरणाखालील गावांनी सतर्क राहावे तालुक्यातील नागापूर वाण धरण शुक्रवारी सकाळी शंभर टक्के भरले आहे. या धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यासाठी तहसील प्रशासनांना कळविले आहे. - रमेश पांचाळ, शाखा अभियंता, नागापूर धरण