सेंद्रिय शेती करण्याची मानसिकता आता बदलत चालली आहे. रासायनिक शेती तात्पुरती उत्पन्नात वाढ करणारी आहे. परंतु यामुळे जमिनीचा ऱ्हास होत असल्याचे दिसू लागले आहे. रासायनिक खताच्या अतिरिक्त वापरामुळे जमीन टणक बनत असून, नापिक बनत चालली आहे. आधुनिकतेच्या नावाखाली व यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले आहे. त्यामुळे शेणखत मिळणे कठीण झाले आहे. शेणखतामुळे शेतीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होत असते.
केंद्र शासनाच्या काळी आई वाचवा.. या अभियानांतर्गत बल्लाळनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याचा संकल्प केला आहे. १५ जूनपासून ५०० एकर जमिनीवर सेंद्रिय सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन म्हणून लातूर येथील टीना व अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने या सोयाबीनची खरेदीची हमी दिली आहे.