बीड : कोरोना सारख्या महामारीत जीव धोक्यात घालून स्वच्छतेसह रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या गट ड कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे हे कर्मचारी मंगळवारी आक्रमक झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासमोर त्यांनी आपला संताप व्यक्त केला. डॉ. साबळे यांनीही वेतनासह इतर समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा रूग्णालयातील अपवादात्मक वगळता इतर सर्व कर्मचारी प्रामाणिक सेवा बजावतात. कोरोना काळात तर गट ड कर्मचाऱ्यांवर स्वच्छतेसह इतर कामांची भिस्त होती. परंतु, तरीही त्यांच्या कामाचा आरोग्य विभागाला किंमत नसल्याचे दिसते. जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावल्या नंतर ही निधीच्या नावाखाली महिन्याच्या १ तारखेला वेतन दिले जात नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांमधून होती. तसेच २० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या गट ड कर्मचाऱ्यांना सर्व लाभ तत्काळ देणे, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचे सर्व लाभ तत्काळ देणे आदी विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यापुढे कैफियत मांडल्यानंतर त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन डाॅ. साबळे यांना दिले. यावेळी पुरूष, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रश्न मार्गी लावा, तक्रारी नकोत गट ड कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली लागणारे आहेत. निधी अथवा इतर काही अडचणी असतील तर उपसंचालक, संचालकांना पत्र पाठवून कार्यवाही करू. स्मरण देऊ. परंतु यांच्याकडून पुन्हा तक्रारी यायला नकोत. सर्व प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना सीएस डॉ. साबळे यांनी प्रशासकीय अधिकारी कुलकर्णी व जाजू यांना दिल्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला.
270721\043027_2_bed_20_27072021_14.jpeg
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्यापुढे वेतन व इतर प्रश्नांबाबत कैफियत मांडताना गट ड कर्मचारी दिसत आहेत.