लोकमत न्यूज नेटवर्कबीड : एका व्यापाऱ्याशी झालेल्या व्यवहारानंतर ते भेटत नसल्याने त्यांच्याविषयी अभियंता प्रशांत संचेती यांना माहिती विचारत त्यांच्या दिशेने पिस्तूल रोखले आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पेठ बीड भागात २० मे रोजी घडला आहे. या प्रकरणी अशोक रोमन याच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक रोमन याने परसमल बाबूलाल संचेती हे कोठे आहेत, ते फोन उचलत नाहीत. त्यांच्याशी माझा व्यवहार झाला असुन ते कोठे राहतात हे सांगा, असे म्हणून रोमन याच्यासह साथीदारांनी लाथा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व त्याच उद्देशाने अशोक रोमन याने त्याच्या कमरेचे रिव्हॉलवर किंवा गावठी कट्टा काढून अभियंत्यांच्या दिशेने लावला. त्यानंतर मंगळवारी संचेती यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी अशोक बाबूराव रोमन याच्यासह इतर आठ ते दहा जणांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक रोमन तडीपार आरोपीअशोक रोमन हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याला पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले. परंतु स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे तो बीडमध्ये खुलेआम फिरत होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. बीड शहरात सध्या आजही तडीपार आरोपी खुलेआम फिरत असल्याचे सांगण्यात आले.