बीड : शहरात सध्या सर्वत्रच चारचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतुकीस तर अडथळा होतच आहे, शिवाय अपघातासही निमंत्रण मिळते. बांधकाम करताना पार्किंगला जागा न सोडल्याने वाहनधारक, मालक सर्रासपणे रस्त्यावर वाहने उभा करत असल्याचे वास्तव बीड शहरात पाहायला मिळते. याकडे ना पोलिसांचे लक्ष आहे ना नगरपालिकेचे.
घर, दुकानाचे बांधकाम करताना वाहन पार्किंगला जागा सोडणे बंधनकारक आहे. त्याशिवाय परवानगीच दिली जात नाही. परंतु मागील काही वर्षांपासून एकदा बांधकाम परवाना दिल्यानंतर त्याची तपासणीच केली जात नाही. त्यामुळे बहुतांश लोकांनी पार्किंगला जागा न सोडताच टोलेजंग इमारती उभारल्या. बीड शहरात तर सुभाष रोड, भाजी मंडई, कारंजा रोड, धोंडीपुरा, डीपी रोड, केएसके कॉलेज रोड या भागात सर्रासपणे चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावर उभी असतात. यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो. पादचाऱ्यांनाही मार्ग काढताना त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, या वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी वारंवार गस्त घालणे आणि नगरपालिकेकडून तपासणी करण्याची आवश्यकता आहे.
सुभाष रोड सर्वात त्रासदायक
बीड शहरातील सुभाष रोडवर तर सर्रासपणे दुचाकी, चारचाकी वाहनांची रस्त्यावरच पार्किंग केली जाते. दुकानदरांनी बांधकाम करताना वाहनांसाठी पार्किंगला जागाच सोडली नाही. त्यामुळे या रोडवर सामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. इतर रस्त्यांचीही अशीच स्थिती आहे.
सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये चारचाकीसाठी पार्किंग
बीड शहरात केवळ सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये चारचाकी वाहनांना पार्किंगची सोय आहे. येथे वाहन उभा करूनच खरेदीला जावे लागते.
पोलीस, पालिकेचे दुर्लक्ष
रस्त्यावर वाहने उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करता येऊ शकते. परंतु पोलिसांकडून या कारवाया केल्या जात नसल्याचे दिसते.
पालिकेनेही बांधकाम परवाना दिल्यानंतर पार्किंगला जागा सोडली की नाही, ते नियमात आहे का, याची पाहणी केली जात नाही. त्यामुळेेच अनधिकृत बांधकाम करून वाहने रस्त्यावर उभी केली जातात.