गेवराई : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रामध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी केली जात आहे. महसूल, पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्याने वाळू उपसा सुरूच आहे.
ध्वनी प्रदूषणाचा त्रास
माजलगाव : येथील तालुका रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेकवेळा वाहनधारक मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक मोठ्या आवाजाने दचकत आहेत. ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याची मागणी होत आहे.
महावितरणला समस्यांचे ग्रहण
अंबाजोगाई : ग्रामीण भागात सध्या विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विजेची मागणी ज्याप्रमाणे वाढत चालली आहे त्याप्रमाणे विजेचा पुरवठा उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक विद्युत पंप अपुऱ्या वीजपुरवठ्याअभावी बंद पडू लागले आहेत. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त स्थितीत असल्याने ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे पार्ट, ऑईलची कमतरता आहे.
खासगी वाहतूक
शिरूर कासार : तालुक्यातील ग्रामीण परिसरात विविध भागात खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या ग्रामीण प्रवाशांकडून जादा भाडे घेऊन लुटण्याचे प्रकार वाढत आहेत.
वाहतुकीस अडथळा
अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध बांधकामाचे साहित्य पडल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. परिणामी लहान-मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे. बांधकाम विभागाकडून सांगूनही साहित्य उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : तालुक्यात बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी, विविध आजार डोके वर काढत आहेत. अनेक गावांमध्ये नाल्या तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे डासांचा उपद्रवही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
गतिरोधक बसवावेत
माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यांसह संभाजी चौक, सिंदफणा पात्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी येथील नागरिक, वाहनधारकांमधून केली जात आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्षच आहे.