बीड : जिल्हा रुग्णालयातील वाढत्या तक्रारी कमी करण्यासाठी आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी वेगवेगळ्या १७ समित्या स्थापन केल्या आहेत. पाणी, वीज, सुविधा, ऑक्सिजन, रुग्णवाहिका आदींचा यात समावेश आहे. ज्या समस्येबद्दल तक्रार येईल, त्या समितीला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयातील नियोजनात सुसूत्रता येण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी शुक्रवारी याबाबत सूचना केल्या आहेत.
जिल्ह्यात कोराेनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांना सुविधा व सेवा देण्यात प्रशासन व आरोग्य विभाग कमी पडत आहे. त्यामुळे तक्रारी वाढत आहेत. या तक्रारी कमी करण्यासाठीच आणि आलेल्या तक्रारींवर तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक विभागासाठी एक स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आहे. यात एका अधिकाऱ्यासह संबंधित विभागातील प्रमुखाला नियुक्त करण्यात आले आहे. ज्या विभागाबद्दल तक्रार येईल, त्या समितीला जबाबदार धरून कारवाई केली जाणार आहे. यामुळे कामात गती येण्यासह नियोजनही चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रत्येक समितीवर आपण स्वत: नियंत्रण ठेवून आढावा घेणार असल्याचेही डॉ. गित्ते यांनी सांगितले.
या विभागासाठी असतील समित्या
विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा, ऑक्सिजन पुरवठा, औषधी, सुरक्षा, स्वच्छता सेवा, मदत केंद्र, फिवर क्लिनिक, स्वॅब तपासणी, रक्त तपासणी, एक्स-रे/एचआरसीटी, ईसीजी, कॉलमन, लसीकरण केंद्र रुग्णवाहिका सेवा, डेथ बॉडी मॅनेजमेंट, साधन सामग्री दुरुस्ती अशा १७ समित्या तयार केल्या आहेत.
कोट
तक्रारी कमी करण्यासह सामान्यांना सुविधा व सेवा वेळेत मिळाव्यात यासाठी प्रत्येक विभागाला समिती नियुक्त केली आहे. थोडीही हलगर्जी झाल्यास थेट समितीला जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे त्यांनीच पूर्ण नियोजन करून तक्रार येणार नाही, याची काळजी घ्यावी. आता हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही.
-डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
===Photopath===
020421\022_bed_13_02042021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयातील स्टाफ संदर्भातील आढावा घेताना जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.सूर्यकांत गित्ते. सोबत मेट्रन संगिता दिंडकर. यावेळी समित्यांबाबतही चर्चा झाली.