शिरूर कासार : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मदतीसाठी कुणाकडे जायचे, याबाबत नातेवाईकांना संभ्रम असतो. घाबरलेले नातेवाईक माहिती घेण्यासाठी भटकंती करत होते. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून शिरूर तहसील कार्यालयात २४ तास माहिती देण्यासाठी मदत कक्ष सुरू केला आहे. यासाठी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी नेमल्याची माहिती देण्यात आली. संबंधित कर्मचाऱ्यांनी आलेल्या सर्व बाबींची तहसीलदार व नायब तहसीलदारांना माहिती द्यायची आहे.
तालुक्यात बाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता सुमारे २७५ रुग्ण क्षमतेचे कोविड केअर सेंटर आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत दिलीप राऊत, विवेकानंद फुंदे व डी. एस. भराटे तर दुपारी दोनपासून रात्री दहापर्यंत ए.व्ही. मिसाळ व एम. के. शेख आणि रात्री दहा ते सकाळी सहावाजेपर्यंत स्वप्निल गायकवाड ,एम. जी. जाधव व बी. जे. सोलार यांची नेमणूक केलेली आहे. या नियंत्रण कक्षातील सर्व अहवाल तहसीलदार,नायब तहसीलदार यांना देण्याचे आदेशित केले आहे. कोविडसंदर्भात कुठलीही माहिती अथवा मदत आवश्यक असल्यास आता भटकंती न करता या नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, शक्य तेवढी मदत देण्याचे काम केले जाईल, असे तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी सांगितले.