- नितीन कांबळे कडा- कामावरून घरी येताना अचानक चक्कर आल्याने पुलावरून नदीपात्रात पडलेल्या एका ४० वर्षीय तरूणाचा २१ तास उलटून देखील अद्याप शोध लागला नाही. ग्रामस्थांकडून वेगवेगळ्या पद्धतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू आहे. राजेंद्र बापुराव पवळ, असे नदीपात्रात बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे
आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील राजेंद्र बापुराव पवळ रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान गावालगत असलेल्या पुलावरून घराकडे येत होता. अचानक चक्कर आल्याने राजेंद्र नदीपात्रात पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गावातील एका तरूणाने पाहिल्यानंतर त्याने ग्रामस्थांना याची माहिती दिली. तत्काळ नदीपात्राकडे धाव घेऊन ग्रामस्थांनी शोध सुरू केला. मात्र, दुसरा दिवस उजाडून २१ तास झाले तरी तरुणाचा अद्याप शोध लागला नसल्याची माहिती केळसांगवीचे सरपंच अजित घुले यांनी दिली.
२१ तास उलटूनही शोध लागेना!लोंखडी गळ, ट्यूबच्या सहाय्याने ग्रामस्थ, पटीचे पोहणारे तरूणाचा शोध घेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत तरूण मिळून आला नाही. तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी आकस्मिक घटनांमध्ये मदत करता येत नसल्याचे सांगितले.
बीड अग्निशमन पथकाला पाचरणदरम्यान, नदीपात्रात बुडालेल्या तरूणाचा शोध लागत नसल्याने बीड येथील अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले होते. पण दोन तासांच्या प्रयत्नानंतर देखील तरुणाचा शोध लागला नाही. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलिस हवालदार अशोक शिंदे, पोलीस नाईक संतोष दराडे, पोलीस शिपाई बिभीषण गूजर आदींनी भेट देऊन सूचना केल्या.