- नितीन कांबळे कडा (बीड) : तालुक्यातील डोईठाण येथील नदीपात्रात वर्षभरापूर्वी एका ३८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, एक वर्षाचा कालावधी उलटला तरीही औरंगाबादहून शवविच्छेदन अहवाल मिळाला नसल्याने तरुणाच्या मृत्यूचे गुढ उलगडले नाही. आणखी किती दिवस अहवालाची प्रतिक्षा करावी लागणार याची चर्चा सुरु आहे.
आष्टी पोलिस ठाणे हद्दीत बीड नगर राज्य महामार्गावरील सांगवी पाटण येथील गतिमंद तरुण ईश्वर त्र्यंबक सुरवसे याचा मृतदेह मागील वर्षी १६ आक्टोबर रोजी डोईठाण येथील नदीपात्रात आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला.
दरम्यान, शवविच्छेदन अहवाल राखून ठेवत मृतदेहाचे काही नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. मात्र, वर्ष उलटले तरी औरंगाबाद येथील प्रयोग शाळेतून अहवाल पोलिसांना मिळाला नाही. यामुळे तरुणाच्या मृत्यूचे गुढ गुलदस्त्यात आहे. या अहवालासाठी आणखी किती दिवस प्रतिक्षा करावी लागणार, अशी चर्चा ग्रामस्थात सुरु आहे. पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी देखील अहवाल अद्याप मिळाला नसल्याची माहिती दिली आहे.