नांदूरघाट(ता.केज): दोन दिवसांपूर्वी माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला. काेरोनामुळे ( Corona Virus ) पतीचे निधन झाल्यामुळे शिक्षिका विरहात होती. माय-लेकीच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे. दरम्यान, मातृप्रेम किती घट्ट असते याचा प्रत्यय बाणेगावच्या (ता.केज) ग्रामस्थांना १६ रोजी आला. विहिरीतील पाणी उपसल्यानंतर आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातात हात होता... हे चित्र पाहून उपस्थितांना गहिवरुन आले. आशा सुंदर जाधवर (२२) व शांभवी सुंदर जाधवर (१८ महिने) अशी त्या माय-लेकीची नावे आहेत. ( The body of a teacher along with her one and a half year old daughter was found in a well )
आशा यांचे बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह सुंदर जाधवर (रा.वडजी ता.वाशी जि.उस्मानबााद) यांच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. आशा व सुंदर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात वास्तव्यास होते. वर्षभरापूर्वी सुंदर यांना कोरोनाची लागण झाली, यातच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या. १६ सप्टेंबर रोजी वडील बाहेरगावी गेले होते तर आई शेतीकामात व्यस्त होती. दुपारी ४ वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा शेतात गेल्या. यावेळी खेळता - खेळता मुलगी विहिरीजवळ गेली. तिचा तोल गेल्याने धावत जाऊन आशा यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींचाही बुडुून मृत्यू झाला.
एकाच चितेवर अंत्यसंस्कारकेज ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे, उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे, जमादार जसवंत शेप, रशीद शेख यांनी धाव घेतली. १६ रोजी रात्री उशिरा मायलेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले. १७ रोजी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. सकाळी ११ वाजता मायलेकीवर एकाच चितेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. कुटुंंबीयांच्या आक्रोशाने उपस्थितांनाही हुंदके आवरता आले नाहीत. नातेवाईकांचे जवाब बाकी असून अधिक तपास सुरु असल्याचे सहायक निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले.
पाच पंपाद्वारे उपसले पाणीआशा व शांभावी या मायलेकी गायब झाल्याने शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी सहा वाजता विहिरीच्या काठावर आशा यांची चप्पल आढळली. त्यामुळे त्या दोघी विहिरीत पडल्याची शक्यता गृहित धरुन तरुणांनी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने पाच विद्युतपंपांद्वारे पाणी उपसा सुरु झाला. रात्री साडेअकरा वाजता पाणी उपसा केल्यावर माय-लेकीचे मृतदेह आढळून आले. यावेळी आशा यांच्या कडेवर मुलगी शांभवी होती तर शांभवीचा हात आईच्या हातात होता.