बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे पोळा सण दुष्काळाचे सावट असताना देखील उत्साहात साजरा करण्यात आला. वर्षभर शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलांचा पोळा हा सण आहे. त्यामुळे शेतकरी बैलाचे सर्व लाड आज पुरवतात. स्वतः उपवास करून कण्या खातात, व बैलाला पुरण पोळी खाऊ घालतात. तसेच बैलाला सजवून त्याची मिरवणूक काढली जाते. त्यांनतर औजारांची पूजा करून पावसासाठी प्रार्थना देखील केली जाते.
पोळ्याच्या दिवशी ग्रामीण भागात मोठा उत्साह असतो. मात्र मागील वर्षांपासून जिल्हयात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम देखील दगा देण्याची शक्यता आहे. मात्र हे सर्व दुःख बाजूला ठेऊन बळीराजसाठी महत्त्वाचा असणाऱ्या बैलाचा हा सण साजरा करत आहे. परंतु पोळ्याच्या दिवशी पाऊस नसल्यामुळे व एकंदरीतच दुष्काळामुळे पूर्वीप्रमाणे सण साजरे करण्यास उत्साह येत नसल्याची प्रतिक्रिया येथील शेतकरी ऋषिकेश जगताप यांनी दिली.