अंबाजोगाई : सध्या एकीकडे कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच दुसरीकडे आयपीएल मॅचचाही सर्वत्र धूमधडाका सुरू आहे. 'आयपीएल'मुळे ऑनलाइन सट्टेबाजीदेखील जोरात चालू आहे. अंबाजोगाईतदेखील आयपीएलवर सट्टेबाजी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी सुनील जायभाये यांच्या पथकाने छापा मारून चार सट्टेबाजांना रंगेहाथ पकडले, तर सात जण पसार झाले.
यावेळी पोलिसांनी पाऊण लाखांचा मुद्देमालही जप्त केला.
पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी शिताफीने श्रीपाल धायगुडे, लक्ष्मीकांत धायगुडे, शुभम धायगुडे आणि संदीप गायकवाड या सट्टेबाजांना ताब्यात घेतले. मात्र, मनोज कालिया, निलेश डिडवाणी, सुरेश सोमाणी, श्रीकांत ऊर्फ गोट्या गोपाळराव धायगुडे, नयन कदम, अभिषेक कदम आणि बबलू कातळे हे सट्टेबाज पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी घटनास्थळाहून मोबाइल, लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण ७५ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार कसबे यांच्या फिर्यादीवरून सर्व ११ आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आयपीएलमध्ये मंगळवारी (दि.२७) दिल्ली कॅपिटलविरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूर असा सामना पार पडला. या दरम्यान अंबाजोगाई शहरातील कुत्तर विहीर परिसरातील तानाजी मालुसरे चौकात काही सट्टेबाज या सामन्यावर सट्टा खेळत आणि खेळवत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या पथकास मिळाली होती. सदर माहितीची खातरजमा झाल्यानंतर जायभाये यांच्या विशेष पथकाने रात्री ८.३० वाजता या ठिकाणी छापा मारला. त्या ठिकाणी सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहून ११ सट्टेबाज मोबाइल, लॅपटॉप, प्रिंटर, एलईडी या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे सट्टा खेळत आणि खेळवत असताना आढळून आले.