लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीसुध्दा घाटनांदूर येथील संपूर्ण बाजारपेठ, किरणा, कापड दुकाने, हॉटेल खाणावळ, पानटपऱ्या ,बार, इतर व्यापारी आस्थापने अगदी कडेकोट बंद होती. घाटनांदूरच्या सभोवताली पस्तीस ते चाळीस वाडी, खेडे आहेत. त्यांचा दैनंदिन व्यवहार घाटनांदूरच्या व्यापारी बाजारपेठेवर अवलंबून आहे. मात्र कारण लॉकडाऊन लागले की सर्वच अत्यावश्यक असलेल्या किराणामालाचे भाव वाढले आहेत. मनमानी भावाचा कळस झाला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल त्या भावाने किराणा घेण्याशिवाय पर्याय त्यांच्यासमोर राहिलेला नाही.
हॉटेल बंद असल्याने दुग्ध उत्पादन करणारे पशुपालक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊननमुळे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, पर्याय नसल्याने सर्व काही निमूटपणे सहन करावे लागत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन योग्य असले तरीही प्रशासनाचा काडीचाही अंकुश नसल्याने दैनंदिन गरजेच्या वस्तूच्या किमती भरमसाठ वाढल्याने गोरगरीब मात्र अडचणीत सापडले आहेत. संपूर्ण बाजारपेठ ओस पडली असून, सोबतच उन्हाचा पारा वाढल्याने रस्ते सुनसान झाले आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच आपापल्या घरात राहण्यास प्राधान्य देत आहेत. लॉकडाऊन शेतकरी,शेतमजूर,कामगार यांच्या मुळावर उठल्याचे दिसत आहे.
शेतकरी, मजुरांची हेळसांड
लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प झाले असून, भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दररोज लागणारा भाजीपाला उत्पादित करून तो विकून प्रपंच चालविणारे शेतकरी देशोधडीला लागत आहेत. उत्पादित भाजीपाला विकायचा कुठे, हा प्रश्न असून तो गुरांना खायला घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हातावर पोट असणाऱ्या मजूरवर्गाची सर्वात जास्त हेळसांड होत आहे.
===Photopath===
270321\20210327_100207_14.jpg