बीड : सामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी बीड राज्य परिवहन मंडळाची लालपरी पडत्या पावसातही सेवेत धावल्याचे चित्र सोमवारी दिसले. ग्रामीण भागातील काही गावांत चिखलातून मार्ग काढत बसेस गावात पोहोचल्या. मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी चालकांनी योग्य काळजी घेतल्याने जिल्ह्यात एकही फेरी रद्द करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून अतिवृष्टी होत आहे. जास्त पाऊस झाल्याने तलाव, धरणे तुडुंब भरून वाहू लागले. त्यामुळे नदी, नाले, ओढे ओसंडून वाहताना दिसत आहेत. काही गावांचा संपर्कही यामुळे काही तासांसाठी तुटला होता; परंतु अशा वातावरणात आणि परिस्थितीतही राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ४०० पेक्षा जास्त बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात जाणाऱ्या ५० बसेसचाही यात समावेश आहे. प्रवाशांचा प्रतिसाद आणि चालकांची सावधगिरी यामुळे विना अपघात लालपरीची सेवा सुरू असल्याचे दिसत आहे.
प्रवासी कमी असले तरी फेऱ्या तेवढ्याच
पावसामुळे काही लोकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे बसेसला नेहमीपेक्षा कमी प्रवासी मिळाले. बीडसह इतर स्थानकांत प्रवाशांची गर्दी कमी होती. असे असले तरी बसेस सेवेसाठी कायम धावत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे रापमंलाही उत्पन्नात लाभ झाला आहे
-
जिल्ह्यात पाऊस झाला असला तरी एकही फेरी बंद करण्यात आलेली नाही. जरी झाली तरी एक दोन दिवसांपुरती वळविली जाते. सर्व बसेस सुरळीत धावत आहेत.
अजयकुमार मोरे, विभागीय नियंत्रक, बीड
--
जिल्ह्यातील एकूण बसेस 547
चालू बसेस 450
ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस 50