बीड : अनलॉकनंतर आता साध्या बसेसपाठोपाठ शिवशाही बसेसही सुसाट धावताना दिसत आहेत. जिल्ह्यात ३० पैकी १५ बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी धावत आहेत. यात औरंगाबाद, पुणे, हैदराबाद या मार्गावर प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येत आहे. यातून ‘रापम’ची तिजोरीही भरत आहे.
जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आता जवळपास पूर्ण क्षमतेने धावताना दिसत आहेत. बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. ग्रामीण भागात पूर्णपणे बसेस धावत नसल्या तरी मुख्य मार्ग व शहरांच्या ठिकाणांवर बसेस जात आहेत. सुरुवातीला साध्या बसेसच प्रवाशांच्या सेवेत सोडण्यात आल्या होत्या. परंतु प्रवाशांची गर्दी आणि वाढता प्रतिसाद पाहता आता शिवशाहीही वाढविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३० शिवशाहीपैकी १५ बसेस सेवेत धावत असल्याचे सांगण्यात आले. हळूहळू पूर्णच बसेस प्रवाशांच्या सेवेत धावतील, असा विश्वास रापमने व्यक्त केला आहे.
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
बसेस धावण्यापूर्वीच आगारांमध्ये बसेस स्वच्छ धुऊन त्यांचे सॅनिटायझेशन केले जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच सर्व प्रवाशांना गर्दी न करण्याबाबत व तोंडाला मास्क लावण्याबाबत आवाहन केले जाते. चालक, वाहक यासाठी जास्त मेहनत घेत असल्याचे दिसून आले.
--
बीड आगारातून सध्या एकच बस धावत आहे. या बससेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांचा असाच प्रतिसाद मिळाल्यास इतर बसेसही सोडण्यात येतील. कोरोनाच्या अनुषंगाने बसेस सॅनिटायझेशन केल्या जात असून, सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. एन. पवार, आगार प्रमुख - बीड
--
एकूण आगार ८
एकूण शिवशाही बसेस ३० चालू शिवशाही बसेस १५