लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शासनाने मागील आठवड्यात खताचे भाव कमी केले आहेत. असे असले तरी येथील दुकानदार चढ्या भावानेच खताची विक्री करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे अनेक दुकानात भाव फलक दिसत नाहीत. याकडे मात्र कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
माजलगाव शहरात ५५ व ग्रामीण भागात ५० खते, बी -बियाणे विक्रीची दुकाने आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपासून खताचे भाव वाढणार असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खताचे साठे केले होते. भाव वाढल्याचे कारण पुढे करीत खताचे बिल न देताच जास्त दराने खत विक्री केली जाऊ लागली. असे असताना व शेतकऱ्यांच्या तक्रारी येत असताना देखील कृषी विभागाचे दुर्लक्ष आहे.
मागील आठवड्यात शासनाने खताची भाववाढ थांबवत खताचे भाव जैसे थे ठेवले. तरी देखील अनेक व्यापाऱ्यांकडून खताची जादा दरानेच विक्री केली जात असल्याच्या तक्रारी शेतकरी वर्गातून होत आहे.
-------
शासनाने खताचे भाव कमी केले असल्याने शेतकऱ्यांनी खते घेताना पक्के बिल घेऊन व तेवढेच पैसे देऊन खते घ्यावीत. कोणी जादा दर लावून कच्ची पावती देत असेल तर शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा.
-ॲड. नारायण गोले, शेतकरी कामगार पक्षाचे नेते.
--
शेतकऱ्यांनी खत विकत घेताना व्यापाऱ्यांकडून पक्की पावती द्यावी. कोणी कच्ची पावती दिल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. ज्यामुळे संबंधित दुकानदारावर कारवाई करणे आम्हाला सोपे जाईल.
-सिद्धेश्वर हजारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, माजलगाव.
....