बीड : कोरोना लस सुरक्षित असल्याचे सांगत ती घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून आवाहन केले जात आहे. परंतु, वास्तविक पाहता याच आरोग्य विभागाच्या ५ हजार लाभार्थ्यांनी अद्यापही लस घेतलेली नाही. यात जिल्हा रुग्णालयातीलच जवळपास ८० डॉक्टरांचा समावेश आहे. यावरून 'लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: कोरडे पाषाण' अशी परिस्थिती आरोग्य विभागाची झाली आहे.
जिल्ह्यातील ११ कोरोना लसीकरण केंद्रांवर आतापर्यंत २८ हजार ४०० लाभार्थ्यांनी लस टोचून घेण्याचे उद्दिष्ट होते. यात हेल्थ केअर वर्कर्स व फ्रंट लाईन वर्कर्सचाही समावेश होता. परंतु, शनिवारपर्यंत जिल्ह्यात केवळ ४८ टक्केच लसीकरण पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात १५ हजार ८०८ हेल्थ केअर वर्कर्स पात्र असतानाही आतापर्यंत केवळ १० हजार १४५ लाभार्थ्यांनी लस टोचली आहे. अद्यापही ५ हजार लाभार्थी यापासून दूर पळत आहेत. इतरांना लस सुरक्षित असल्याचे सांगणाऱ्या आरोग्य विभागाचेच महिना उलटूनही १०० टक्के लसीकरण न झाल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.
संपर्क करूनही येईनात पुढे
कोरोना लसीकरणाचा संदेश पाठवूनही पुढे न आलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा एकदा वैयक्तिक संपर्क करून लस घेण्याचा हट्ट धरला जात आहे. असे असतानाही ते लोक पुढे येत नसल्यानेच लसीकरणाचा टक्का निराशाजनक असल्याचे दिसते.
१० पैकी ३ हजार फ्रंटलाईन वर्कर्सने घेतली लस
जिल्ह्यात महसूल, पोलीस, शिक्षक, नगर पालिका या विभागातील १० हजार ६९ फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी आहे. पैकी आतापर्यंत ३ हजार ४७१ लाभार्थ्यांनीच लस घेतली आहे. अद्यापही ७ हजार लाभार्थी यापासून दूर आहेत.
केवळ ६२३ लाभार्थ्यांचा दुसरा डोस
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील २८ ते ४५ दिवसांपर्यंत दुसरा डोस घेणे अपेक्षित असते. परंतु, आतापर्यंत केवळ ६२३ लाभार्थ्यांनीच लस घेतली आहे. याचे प्रमाण केवळ १४ टक्के आहे.
नोंदणीचा घोळ, लाभार्थ्यांची धावपळ
पालिका, पोलीस विभागाची नोंद त्यांच्याच विभागाकडून झालेली आहे. असे असतानाही अनेकांची नावे आली नाहीत. पोलीस अधीक्षकांनी आदेश काढल्याने सोमवारी कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. आरोग्य विभागात आल्यावर त्यांना परत पाठविण्यात आले. त्यातच कोवीन ॲपमधील अनेक त्रुटींचाही अडथळा होत आहे. अनेकांची नावे दोन ते तीन वेळा समाविष्ट केली जात आहेत.
कोट
जिल्ह्यात शनिवारपर्यंत १०१४५ हेल्थ केअर वर्कर्स व ३४७१ फ्रंटलाईन वर्कर्सने लस घेतली आहे. याचे प्रमाण ४८ टक्के आहे. लाभार्थ्यांना आवाहनही केले जात असून वैयक्तिक संपर्कही केला जात आहे.
डॉ.संजय कदम
नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण, बीड
----
अशी आहे आकडेवारी
हेल्थ केअर वर्कर्स नोंदणी - १५८०८
लस घेतलेले - १०१४५
बाकी - ५६६३
---
फ्रंटलाईन वर्कर्स नोंदणी - १००६९
लस घेतलेले - ३४७१
बाकी - ६५९८