कृषी विभागाचा उपक्रम : शेतकऱ्यांना कापूस लागवडीसह बियाणे खरेदीसाठी मार्गदर्शन
बीड : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ‘एक गाव, एक वाण’ अभियानांतर्गत ११ गावांची निवड करण्यात आली असून, गावांमध्ये एकाच वाणाचे कापूस बियाणे लागवड करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांना कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महाकॉट स्मार्ट कॉटन अभियानांतर्गत पिंपळनेर येथे कृषी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक गावात किमान पन्नास शेतकऱ्यांचा एक गट असे पाच गट स्थापन करण्यास सांगून, कापसाचे एक वाण लागवड करून दर्जेदार उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी साळवे यांनी केले आहे. एकप्रकारचा आणि स्वच्छ कापूस कापड उद्योगाला उपलब्ध करून देणे, कापूस उत्पादनांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग न राहता कापूस प्रक्रियेनंतर बाजार व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे आणि यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळवून देणे, असे विविध फायदे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी बुद्धभूषण मुनेश्वर यांनी स्मार्ट कॉटन ‘एक गाव, एक वाण’ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले; तर निवृत्त कृषी अधिकारी चांडक यांनी कापूस लागवडीबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी पिंपळनेर गावातील प्रगतीशील शेतकरी तसेच नवीन तंत्रज्ञान अवलंब करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक वी. डी. सोनवतीकर, कृषी सहायक सी. एन. वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले.
===Photopath===
030621\4414333203_2_bed_11_03062021_14.jpeg
===Caption===
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना अधिकारी दिसत आहेत.