लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील कोळगाव येथील जि.प. शाळेतील समस्यांबाबत ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषण करुनही याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्वत:हून मागे घेतले होते. दरम्यान, शाळेतील भौतिक सुविधांबाबत प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मंगळवारी संतप्त ग्रामस्थांनी अखेर शाळेला कुलूप ठोकले. जोपर्यंत शाळेच्या संदर्भातील मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शाळा उघडणार नसल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.तालुक्यातील कोळगाव येथील जि.प. शाळेची इमारत ही जुनी झाली असून, मोडकळीस आली आहे. ही इमारत वापरास योग्य नसल्याचा अहवाल देवूनही प्रशासनाकडून नवीन इमारत मंजुरी व निधी उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शाळेला संरक्षण भिंत नसल्याने प्रांगणाचा शौचासाठी वापर होत आहे.परिणामी शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेसाठी नवीन इमारत, संरक्षक भिंत आदी मागण्यासंदर्भात पाठपुरावा करुनही तीन वर्षांपासून आंदोलन करु नही समस्या मार्गी लागल्या नाहीत. तसेच आठ दिवसांपूर्वी शाळेसमोर शालेय समिती अध्यक्ष रमेश करांडे व ग्रामस्थ उपोषणाला बसले होते. मात्र या उपोषणाकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने हे आंदोलन ग्रामस्थांनी स्वत:हून मागे घेतले होते.यानंतर तात्काळ मागण्या मान्य न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला दिला होता. तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर मंगळवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. यावेळी रमेश करांडे, उपाध्यक्ष प्रकाश येडे, गोविंद रासकर, रमेश टाकसाळ, अमोल बनसोडे, रमेश टाकसाळ, गोरख जोगदंड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अखेर कोळगाव ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:16 AM