लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : दोन दिवसांपूर्वी शहरातील विद्यानगर भागात अनंतराव जगतकर यांचे घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमर देशमुख यांचे विमलसृष्टीमधील घर दिवसाढवळ्या फोडून चोरट्यांनी जवळपास सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला.
अमर देशमुख हे बीड रोडवर चनई शिवारातील विमलसृष्टीमध्ये राहतात. शनिवारी सकाळी ११ वाजता ते घराला कुलूप लावून कुटुंबियांसह माकेगावला गेले होते. त्यामुळे घरी कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दुपारच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील सर्व समान अस्ताव्यस्त करून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले लॉकेट, अंगठ्या, मिनीगंठन, झुमके, नथ आदी अंदाजे १ लाख २६ हजार ७५० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख ५ हजार रुपये असा एकूण १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचा ऐवज लंपास केला. सायंकाळच्या सुमारास घराचा दरवाजा उघड दिसल्याने शेजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी चोरी झाल्याची माहिती देशमुख यांना दिली. याप्रकरणी अमर देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर कलम ४५४, ३८० अन्वये अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहा. फौजदार सोनेराव बोडखे हे करत आहेत.वाढत्या चोरी, घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भितीशहरात आठवड्याभरात चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चोरट्यांनी जवळपास सात लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला. घरफोडीच्या घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.