अनिल गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्ककुसळंब : देशसेवेची परंपरा असलेल्या आणि आदर्श गाव ठरलेल्या श्री क्षेत्र कुसळंब येथील जन्मभूमीतील माजी सैनिकांनी एकत्र येत मुक्या जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘देशसेवा ते गोसेवा’ साठी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असून, परिसरात त्यांच्या सामाजिक योगदानाला धन्यवाद दिले जात आहेत.सध्या १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ असून, बळीराजाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. नुकतेच भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले सैनिक काशीनाथ तुकाराम सरोदे, महादेव आत्माराम धारक, बाळासाहेब किसनराव पवार, विश्वंभर मारुती पवार यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर छावणी रुपातून ८३३ मुक्या जनावरांना चारा व पाण्याचा सुरळीत पुरवठा सुरु केला आहे. नुकतीच पाटोदा येथील अधिकाऱ्यांनी येथे भेट देत समाधान व्यक्त केले. संकट प्रसंगी बळीराजाचा मुख्य आधार असलेल्या गुरांना वाचवण्यासाठी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असल्याचे शेतकरी हनुमंत नामदेव पवार यांनी सांगितले. माजी सैनिकांच्या या सामाजिक सेवेची प्रशंसा होत आहे.स्वहितापेक्षा राष्ट्र व समाज हिताला प्राधान्य देणारे सैनिक असतात. सैनिकामुळे सामान्य नागरिक स्वस्थ निद्रा घेऊ शकतो. मात्र, हेच सैनिक निवृतीनंतर गावाकडे अशी बळीराजाची गो- सेवा करत असतील तर त्यांना आदराचा सॅल्युट अशी प्रतिक्रिया संस्कृती व समाज अभ्यास प्रा. बिभीषण चाटे यांनी दिली.
कुसळंबच्या माजी सैनिकांचा जन्मभूमीला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 1:24 AM