बीड : जिल्ह्यात उसतोडणीला जाणाऱ्या ज्या महिलांची गर्भ पिशवी शस्त्रक्रिया झालेली आहे, त्या सर्व महिलांची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून ९ आॅगस्टला पुन्हा तपासणी केली जाणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. बुधवारी जिल्हा प्रशिक्षण केंद्रात यासंदर्भात बैठकही घेण्यात आली.
प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कार्यक्रमांतर्गत गर्भवती महिलांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी केली जाते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती आ.डॉ.निलम गोºहे यांच्या सुचनेनुसार गर्भ पिशवी काढलेल्या महिलांचीही तपासणी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने बीड आरोग्य विभाग कामाला लागला आहे. याच विषयासंदर्भात बुधवारी सकाळी प्रशिक्षण केंद्रात जिल्हास्तरीय सर्व पर्यवेक्षकांची बैठक घेण्यात आली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम, डॉ. सचिन शेकडे, डॉ.लक्ष्मीकांत तांदळे, डॉ.संतोष गुंजकद आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पर्यवेक्षकांना आॅनलाईन माहिती भरण्यासंदर्भात सूचना केल्या. तपासणी करण्यासह रक्त चाचण्या महालॅबद्वारे कराव्यात. आवश्यकतेनुसार औषधोपचार तसेच त्यांना अॅनेमिया मुक्त भारत योजनेबद्दल माहिती देऊन उपचारात्मक व प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यासंदर्भात सुचना केल्या. गरजेनुसार त्यांना जिल्हा रूग्णालय अथवा अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात पाठविण्याले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारांवर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष ठेवणार आहेत.