अंभोरा (जि. बीड) : तीव्र इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर दिव्यांग ग्रुपने रविवारी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ला सर केला. यात बीडचा कचरु चांभारे या गिर्यारोहकाचा समावेश होता. दिव्यांग बांधवांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिवदुर्ग प्रतिष्ठानकडून दुर्ग भ्रमंतीचे आयोजन केले होते.
लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यात असून, भक्कम गिरीदुर्ग आहे. ज्याची उंची ३४२० फूट असून, निर्मिती अडीच हजार वर्षांपूर्वीची आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाचे भाग्य लोहगडास लाभलेले आहे. सुरतेहून आणलेली संपत्ती काही काळ लोहगडावर ठेवली होती. किल्ल्यावर मजबूत बुरूज, चिरेबंदी पायऱ्या, बुलंद दरवाजे, पाण्याच्या टाक्या, तलाव आहेत. गडाचे शेवटचे टोक असलेल्या विंचूकड्यावर पोहोचले, तेव्हा दिव्यांग बांधवांचा आनंद ओसंडून वाहणारा होता. ‘हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय...’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. लोहगडावरून विसापूर किल्ला, विहंगम पवना धरण, तुंग व तिकोना किल्ला स्पष्टपणे दिसतात.
शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वात राज्यातील दहा दिव्यांगांनी लोहगड दुर्गभ्रमंती यशस्वीरित्या पूर्ण केली. या दुर्ग मोहिमेत बीड तालुक्यातील मन्यारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तथा कोंडाजी फर्जंद ट्रेकर्सचे दुर्गप्रेमी, निसर्गलेखक कचरू चांभारे यांचा सहभाग होता. या मोहिमेत नितीन टेमघरे- लोणावळा, सागर बोडखे- मुंबई, धर्मेंद्र सातव- पुणे, जगन्नाथ चौरे, प्रा. गोंडे, बाबर, घुमरे यांनी सहभाग घेतला.