लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : नगर-बीड रस्त्यावरील साबलखेड-आष्टी दरम्यान जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवासी, वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अपघाताचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे या रस्त्यांची खड्डे बुजवून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
या रस्त्यासाठी कडा येथील तरुणांनी गांधीगिरी, रास्ता रोको आंदोलन केले. याची दखल घेऊन खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असली तरी डांबर खडीऐवजी मुरूम टाकून राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची बोळवण सुरू आहे. बीड-नगर या राष्ट्रीय महामार्गाचे बऱ्यापैकी काम झाले आहे. आष्टी-कडा-साबलखेड या ठिकाणी अर्धवट काम राहिल्याने मोठ्या प्रमाणावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा वाहनधारक, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर दररोज अपघात होत आहेत. यात अनेकांचा जीवदेखील गेला आहे. हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. संबंधित विभागाकडे दुरुस्तीसाठी अनेक वेळा मागणी करूनदेखील दुर्लक्ष होऊन उडावाउडवीची उत्तरे मिळत असल्याने मागील आठवड्यात काही तरुणांनी गांधीगिरी केली.
...
डांबर टाकूनच खड्डे बुजवावेत
सोमवारी शहरवासीयांनी रास्ता रोको आंदोलन केले. याची दखल घेऊन खड्डे बुजविण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले. त्यावर डांबर, खडी टाकून बुजवणे अपेक्षित असताना लोकांच्या मागणीची पूर्तता नावाला करून याच खड्ड्यांत मुरूम टाकून बोळवण केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने खडी, डांबर टाकून खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दीपक गरूड यांनी केली आहे.
....
पावसाळ्यात डांबर आणि खडी टाकून खड्डे बुजवता येत नाहीत. तोपर्यंत मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्याचे दिवस संपल्यानंतर डांबरीकरणाने खड्डे बुजविण्यात येतील.
-दिलीप तारडे, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.
150921\nitinkamble1111-023901391_14.jpg
नगर-बीड रोडवरील साबलखेड ते आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.