बीड : जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतातील लवकरात-लवकर पाण्याचा निचरा करणे गरजेचे आहे. जेणेकरून बुरशीजन्य रोगांपासून शेतातील उभ्या पिकांचे संरक्षण होईल. त्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
खरीप हंगामातील मूग, उडीद ही पिके काढणीला आली आहेत, तर सोयाबीन पिकाला काही दिवस बाकी आहेत. कापूस-कांदा-तूर ही पिके शेतात उभी असताना जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही, तर पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असून, शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी करावेत हे उपाय
१ सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे, तसेच ढगाळ वातावरणामुळे पाने पिवळी पडणे, शेंगवर काळे खोलगट चट्टे पडणे अशा बुरशीजन्य करापा रोगाची लक्षणे दिसून आल्यास खालीलपैकी एका बुरशनाशकाची प्रति १० लीटर पाणी या प्रमाणात मात्रा घेऊन फवारणी करावी, तसेच टेब्यूकोनाझोल १२.५ मिली किंवा टेब्यूकोनाझोल व सल्फर २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाझोल ५ टक्के ईसी १० मिली याचा वापर करावा.
२ तूर : पिकात मरीचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मरग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी, तसेच चोहोबााजूनी एक मीटर अंतरावर बाविस्टिन २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.
३ कापूस या पिकात आकस्मित मर अथवा मूळकूज दिसू लागल्यास कॉपर ऑक्सिकलोराइड २५ ग्रॅम व युरिया २०० ग्रॅम त्यासोबत पंधरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन झाडांच्या मुळाना द्यावे.
४ कांदा : पाऊस जास्त झाल्यास शेतात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. ताबडतोब जास्तीच पाणी निचरा करावा, जास्त पावसामुळे कांद्याच्या पाती पिवळी पडली असल्यास (नत्राच्या कमतरतेमुळे) १०० ग्राम युरिया प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
.................
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संबंधित कृषी सहायकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी देखील वेळोवेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून उपाययोजनेच्या संदर्भात माहिती घ्यावी व उपाययोजना कराव्यात.
बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड.
060921\06_2_bed_14_06092021_14.jpg~060921\06_2_bed_13_06092021_14.jpg
पिकांचे झालेले नुकसान ~कापूस पीक पाण्याखाली